पुरेशी कर्बोदके आवश्‍यकच! केतकी इतराज(Sunday, January 09, 2011 ,सकाळ , सप्तरंग)

शरीराची झीज भरून काढणे, प्रतिकारक्षमता वाढवणे ही प्रथिनांची प्रमुख कार्ये होत. कर्बोदकांप्रमाणेच एक ग्रॅम प्रथिने साधारणपणे चार उष्मांक देतात. मात्र, प्रथिनांचे कार्य सुरळीत चालण्यासाठी शरीरात पुरेशी कर्बोदके असणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
हारशास्त्रातील डाएटनंतरचा सर्वात लोकप्रिय शब्द म्हणजे “कॅलरीज्‌’! कॅलरीज्‌ हा शब्द संभाषणात वापरणं, शब्दाची सध्या फॅशन आहे, असं म्हटलं तरी योग्यच ठरेल. आजकाल बऱ्याच पाककृती लो कॅलरीज्‌ म्हणून सर्वांनाच आकर्षित करत आहेत. या लोकप्रिय शब्दाचा मराठी अनुवाद म्हणजे “उष्मांक’! एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर त्यातील अन्नघटकांपासून शरीराला मिळणारी ही ऊर्जा. आपल्या शरीराला लागणारी ऊर्जा आपले वजन, जीवनशैली, कामाचे स्वरूप आणि इतर वैद्यकीय समस्या यावर अवलंबून असते.या उष्मांकाचे प्रमुख स्रोत म्हणजे कर्बोदके अर्थात कार्बोहायड्रेट्‌स! एक ग्रॅम कर्बोदके सुमारे चार कॅलरीज्‌ देतात. आपल्या आहरातील तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका यांसारखी तृणधान्ये, पिष्ठमय पदार्थ, गोड पदार्थ, कंदमुळे या कर्बोदकांचे प्रमुख स्रोत होय. शरीराच्या विविध कामांसाठी लागणारी ऊर्जा पुरवणे हे या कर्बोदकांचे प्रमुख काम. ऊर्जानिर्मितीच्या जटिल प्रक्रियेत आवश्‍यक असणारी ब जीवनसत्त्वे या घटकांतून मिळतात. डाळी, कडधान्ये, दूध हे पदार्थ प्रथिने म्हणजेच प्रोटिन्स या घटकांतर्गत मोडतात. मांसाहारी पदार्थ हे उत्तम दर्जाच्या प्रथिनांचे स्रोत आहेत. मात्र, शाकाहार आपल्या शरीराच्या प्रथिनांची गरज पूर्ण करण्यास असमर्थ आहेत, असे मुळीच नाही. अशी प्रथिने शरीराला लाभदायक असतात. भाज्यांमधील प्रथिनेही काही प्रमाणात कर्बोदके व इतर प्रथिनांबरोबर सेवन केली असता त्यांची गुणवत्ता सुधारते. सोयाबिनसारखा प्रथिनांचा स्रोत म्हणजे शाकाहारी लोकांसाठी जणू पर्वणीच! शरीराची झीज भरून काढणे, शरीराला सर्वतोपरी सक्षम ठेवणे, प्रतिकारक्षमता वाढवणे ही प्रथिनांची प्रमुख कार्ये होत. कर्बोदकांप्रमाणेच एक ग्रॅम प्रथिने साधारणपणे चार उष्मांक देतात. मात्र, प्रथिनांचे कार्य सुरळीत चालण्यासाठी शरीरात पुरेशी कर्बोदके असणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. आणखी एक महत्त्वाचा आणि सध्याच्या युगातील सर्वाधिक लोकप्रिय; तसेच वादग्रस्त ठरणारा घटक म्हणजे फॅट्‌स. मराठी नाव ः स्निग्ध पदार्थ! तेल, तूप, बटर, चीज, लहानग्यांचे लाडके मेयोनीज्‌ हे सर्व स्निग्ध पदार्थ. यांच्या सेवनाने शरीराला प्रचंड प्रमाणात ऊर्जा मिळत असते. एक ग्रॅम फॅट तब्बल नऊ कॅलरीज्‌ ऊर्जा देतात, जे वरील दोन अन्नघटकांच्या अक्षरश: दुप्पटच! म्हणून या अन्नघटकांची शरीराला अतिशय माफक प्रमाणात आवश्‍यकता असते. शरीरालऊर्जा देण्याबरोबरच हृदय, मूत्रपिंड यांसारख्या अतिमहत्त्वाच्या इंद्रियांना संरक्षक आवरणाद्वारे अपघाती धक्‍क्‍यांपासून जपण्याचे कामही हे अन्नघटक चोख बजावतात.म्हणूनच आहारातून स्निग्ध पदार्थ पूर्णत: वर्ज्य करणे मुळीच हितावह नसते. मात्र त्यांचे स्रोत आणि वापर यांचे परिणाम बदलून त्यांची गुणवत्ता निश्‍चितच वाढविता येते. मर्यादित वापराने शरीराला होणाऱ्या अपायांपासून बचाव करता येतो. मात्र, अवास्तव सेवन चरबी वाढवून हृदयविकारांसारख्या भीषण आजारांना निमंत्रण देणे ठरू शकते. 
Please follow and like us: