‘फूड पिरॅमिड’चा तोल सांभाळा! (केतकी इतराज, Sunday, February 06, 2011 )

चौरस आहार / समतोल आहारामध्ये सुमारे 55 ते 60 टक्के कर्बोदके, 15 ते 20 टक्के प्रथिने आणि दहा टक्‍क्‍यांपेक्षा अधिक स्निग्ध पदार्थ असावेत. हे प्रमाण निरोगी माणसाच्या संतुलित आहाराचे आहे. प्रकृतीच्या समस्यांनुसार यात बदल होणार, हे ओघानेच आले.चौरस आहाराचे हे गणित सोडवण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे “संतुलित आहाराच्या त्रिकोणाचे’ (Food Pyramid) पालन!
                  Food Pyramid / संतुलित आहाराचा त्रिकोण खरोखरीच आकर्षक रंगसंगतीद्वारा व चित्ररूप संकल्पनेने लहान-मोठ्या साऱ्यांनाच आहाराचे बारकावे समजावून सांगण्यात यशस्वी होतो. या त्रिकोणाचा पाया असणारी तृणधान्ये आपल्याही संतुलित आहाराचा पायाच म्हणायला हवीत. बहुतांश वेळा यातील काही अन्नघटक हे आपले “प्रमुख अन्न’ असतात.उदाहरणार्थ : दक्षिण भारतीय – भात, महाराष्ट्रीय – ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ इत्यादी. त्रिकोणाच्या निमुळत्या होत जाणाऱ्या टोकाप्रमाणे अन्नघटकांचे प्रमाणही बदलत जावे, असा सोपा उपाय यातून दिसतो. बऱ्याचदा आहारात नसणाऱ्या किंवा क्वचितच असणाऱ्या फळांचे आणि भाज्यांचे आहारातील स्थान तितकेच महत्त्वाचे आहे. मोठ्या प्रमाणात खाण्यात येणाऱ्या गोड आणि तेलकट-तुपकट तळणीच्या पदार्थांची जागा या पिरॅमिडमधील इवल्याशा टोकाएवढीच आहे, याची नोंद नक्कीच घ्यायला हवी!शरीराच्या उष्मांकांच्या गरजेनुसार व वैद्यकीय समस्यांनुसार काही अन्नघटकांचे प्रमाण कमी-अधिक होत असते. मात्र, इवल्याशा टेकूला बारीक टोकावरून काढून विस्तृत पायापर्यंत आणण्याची चूक झाली तर आपल्या संतुलित आहाराचा हा त्रिकोण डगमगणार हे नक्की!

“वाचाल तर वाचाल’ ही अनेकांनी अनेकदा वापरलेली उक्ती आता सगळ्यांनाच ठाऊक आहे. मी या उक्तीत थोडा बदल करीन. “वाचाल-कराल-तरच वाचाल’, असे मी म्हणेन. यातील कराल हा शब्द कधीही विसरता कामा नये.

आता, गंमत म्हणून का होईना सर्वांनीच आपल्या सध्याच्या आहाराचा त्रिकोण काढून एकदा जरूर पडताळून पाहावा!

Please follow and like us: