संक्रांत घेते ‘डाएट’ची काळजी!(केतकी इतराज Sunday, January 16, 2011, सकाळ,सप्तरंग)

ववर्षाची गोड, मधुर, रंगीबेरंगी सुरवात करणारा सण म्हणजे मकार संक्रांत. “तीळ-गूळ घ्या; गोड बोला’ म्हणत झाले-गेले विसरून जायला लावत नात्यांमधील काटेरीपणातही तिळाची स्निग्धता हा सण आणतो.
लाल-हिरव्या-निळ्या-नारिंगी अशा वेगवेगळ्या रंगांचा आणि अगदी हलकासाच बोचणारा गोड गोड हलवा ही तर लहानग्यांसाठी केवढी मौज!महाराष्ट्रातील ही संक्रांत दक्षिण भारतात आणि देशाच्या इतर भागांतही विविध नावांनी साजरी केली जाते. आपल्या महाराष्ट्रात रंगीबेरंगी हलवा, तीळ-गुळाची वडी, गुळाची पिवळीधमक पोळी आणि त्यावर चमचाभर साजूक तूप…असा जय्यत बेत असतो. दक्षिणेकडेही पोंगल हा विशेष पदार्थ तयार केला जातो.
या “खाद्यसफारी’चा मागोवा घेत बारकाईने विचार केल्यास खरोखरीच अप्रूप वाटते आणि लक्षात येते की, आपले पूर्वज अगदी पहिल्यापासून Diet सांभाळत होते! आता तुम्ही म्हणाल की, Dietician च्या नजरेला जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी Diet च दिसतंय…पण असं थट्टेवारी नेऊ नका मला…Diet मी खरंच सांगतेय…अगदी खरं!

एक इवलासा तो तीळ आणि चिमुरडीशी ती वडी; पण आपल्या सचिनसारखंच “मूर्ती लहान; पण कीर्ती महान’ असं आहे बरं का हे प्रकरण! हाच इवलासा तीळ आहारातल्या कॅल्शियमचा उत्तम स्रोत. कॅल्शियमबरोबरच इतरही बारीकसारीक; परंतु आवश्‍यक असे काही घटकही आपल्याला तिळातून मिळतात. तिळामध्ये असणारे स्निग्धांश शरीराला बलवर्धक, पुष्टिवर्धक असतात. विशिष्ट प्रमाणात केलेल्या तिळाच्या सेवनाने शरीरातील चरबी कमी करण्यापासून ते अगदी उतारवयातील पाळीच्या समस्यांपर्यंत हा तीळ गुणकारी ठरतो. तिळाचे सेवन सौंदर्यवर्धक तर आहेच आहे; पण ते तारुण्य चिरकाल टिकवण्यासाठी उपयुक्त आहे.

संक्रांतीच्या निमित्ताने जेवणात येणाऱ्या बहुरंगी, बहुढंगी पदार्थांमुळे आहारात पौष्टिकतेबरोबरच नावीन्य, वैविध्य (आणि चविष्टपणाही!) साधता येते. बरेच लोक अगदी ठामपणे सांगतात : “Diet  म्हणजे काय? अगदी सोप्पंय…! पांढरे पदार्थ वर्ज्य करणे!’ पण हा छोटासा पांढरा तीळ मात्र त्या गटातील नाही हां!
संक्रांतीचा आदला दिवस भोगी म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशीही बाजरीची भाकरी, मिश्र भाज्यांची एकच चवदार भाजी आणि लोण्याचा गोळा…असा विशिष्ट बेत असतो. ऋतुमानाप्रमाणे होणारे बदल, पूर्वीची जीवनशैली, शारीरिक झीज या साऱ्या गोष्टी ध्यानात घेऊन या आहाराकडे पाहिले तर संस्कृती आणि आरोग्य यांचा अनोखा मिलाफ येथे साधलेला आढळेल. संक्रान्तीच्या काळात असणाऱ्या कडाक्‍याच्या थंडीत आपल्या शरीराला अधिकाधिक उष्मांक आणि ऊर्जा निर्माण करणाऱ्या पदार्थांची आवश्‍यकता असते. या पदार्थांचा अगदी पारंपरिक पद्धतीने आपल्या जेवणात याच काळात झालेला समावेश किती औचित्यपूर्ण आहे!

एखाद्या ठिकाणची खरी ओळख असते ती तेथील खाद्यसंस्कृती. आपली आवडनिवड, हौसमौज आणि खवय्यांचा चोखंदळपणा सांभाळून आरोग्य जपणाऱ्या या खाद्यसंस्कृतीचा नव्या पिढीनेही निश्‍चितच आदर करायला हवा!

Please follow and like us: