शाकाहाराला द्या दुधाची जोड (केतकी इतराज, Sunday, January 30, 2011, सकाळ,सप्तरंग)

शाकाहारी असणं आरोग्याला लाभदायक ठरतं, यावर शक्‍यतो दुमत नसावं. Cholesterol-free राहण्याचा तो हमखास उपाय आहे, हे तर आपण पाहिलंच; परंतु शाकाहारी नसलेल्या लोकांचं काय?मांसाहार पूर्णतः वाईट आहे का, असे तेही विचारणारच! प्रथिनांचा अत्यंत उत्कृष्ट स्रोत म्हणजे मांसाहार. अगदी बरोबर! पण मग आता यातून सुवर्णमध्य काय? प्रथिनांची गरजही भरून काढली जावी, मेद आणि चरबीही वाढू नये असा आहार घेणे!केवळ शाकाहार म्हणजे काहीजण कोणतेच प्राणिजन्य पदार्थ सेवन करत नाहीत. अगदी दूधही नाही! अर्थातच प्रचंड प्रमाणात कॅल्शियमची कमतरता त्यांच्यात दिसून येते. या आहारात वनस्पतीजन्य पदार्थ अधिक असल्याने तंतूमय पदार्थांचे प्रमाण अधिक असते व त्यामानाने मिळणारी ऊर्जा कमी. लहान मुलांच्या ऐन वाढीच्या वयात आवश्‍यक उष्मांक देण्यास ही आहारप्रणाली अपुरी ठरते. या आहारप्रणालीत इ2 जीवनसत्त्वाची हमखास कमतरता आढळते. या शाकाहाराला दुधाची जोड मिळाल्यास कॅल्शियमची कमतरता भरून निघतेच; शिवाय चांगल्या प्रतीची प्रथिनेही शरीराला देता येतात. मात्र, लोह, ड जीवनसत्त्व यांचे पुरेसे शोषण करणे हे केवळ वनस्पतीजन्य स्रोतांमधून अपुरे ठरते. म्हणूनच आपल्या आहारात दूध, दही, ताक व इतर दुग्धजन्य पदार्थांचे प्रमाण पुरेसे असावे. यांमुळे कॅल्शियम, प्रथिने, काही प्रमाणात इ12 जीवनसत्त्वाचा समावेश शक्‍य होतो. आपल्या सुजलाम्‌-सुफलाम्‌ देशावर सूर्यदेवाची कृपादृष्टी तर आहेच! यामुळे ड जीवनसत्त्व शरीरात तयार होऊन हाडांना बळकटी मिळण्यास मदत होते. काही विशिष्ट मिश्रणांन्वये प्रथिने शाकाहारी असूनही त्यांची गुणवत्ता वाढवता येऊ शकते, हे आपण गेल्या काही भागांत पाहिले आहेच. डाळी, कडधान्यांबरोबरच उकडलेले अंडे हा प्रथिनांचा पूरक स्रोत ठरू शकते.
मांसाहारी लोकांनी मांसाहाराचे सातत्य कमी करून कमी तेलात शिजवलेले चिकन / मासे खाल्ल्यास अतिरिक्त स्निग्धांशापेक्षा उत्तम दर्जाच्या प्रथिनांचा त्यांना खऱ्या अर्थानं लाभ घेणं शक्‍य होईल.* कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी शाकाहाराला द्या दुधाची जोड.
* दुधामुळे चांगल्या प्रतीची प्रथिनेही शरीराला मिळतील.
* डाळी, कडधान्याबरोबरच उकडलेले अंडेही प्रथिनांसाठी पूरक स्रोत.
* मांसाहारी मंडळींनी कमी तेलात शिजवलेले चिकन, मासे खावेत. अतिरिक्त स्निग्धांश टळेल. उत्तम दर्जाची प्रथिने मिळतील.

Please follow and like us: