फेब्रुवारी महिन्यातली आमच्या घरातली एक Routine सकाळ. सकाळच्या लगबगीत आणखी एक घाई ; ” लवकर निघा, उन्हं डोक्यावर आलीत…’! खरंच की ! आत्ता-आत्तापर्यंत घुटमळणारी थंडी कधी पळाली कळलंच नाही! भल्या सकाळी लख्ख तळपणारा सूर्य चाहूल देत होता जणू
“उन्हाळा आला..!’ उन्हाळा म्हणजे डोळ्यांसमोर येते ती धमाल सुट्टी, रसाळ हापूस…पण त्याआधी “परीक्षा’
चिमुकल्यांना लागणारे हे सुट्टीचे वेध मोठ्या ताई-दादांसाठी मात्र एक tension घेऊन येतात. दहावी-बारावी म्हणजे तर विचारायलाच नको! कोण्या एकाचीच नव्हे तर आख्ख्या घराची असते जणू परीक्षा. टीव्ही बंद, खेळ बंद, शुभचिंतकांचे शुभेच्छा देण्यासाठी मार्गदर्शनपर फोन, शाळा-कॉलेजांच्या सराव परीक्षा, उजळण्या, माय-लेकांची जागरणं… खरी परीक्षा इथूनच सुरू होते, बरं ! Its time for Exam Fever….’ आई-वडील- आप्तेष्टांच्या अपेक्षांचा तणाव, स्पर्धात्मक युगात स्वतःशी असणारी स्पर्धा यांमध्ये सुरू होतात जागरणं, तासन्तास बसून अभ्यास, पाठांतर, झोपेवर विजय मिळवण्यासाठी कमी जेवणे किंवा अगदी न जेवणे आणि बरंच काही… या काळात निरोगी, उत्साही, तरतरीत राहिल्यास अभ्यास वेळेत पूर्ण करण्यापासून ते केलेला अभ्यास लक्षात राहण्यापर्यंत निम्मे यश इथेच सर करता येते. मात्र, बरेचदा हाच दुवा कमकुवत राहतो आणि मग टिपिकल Pre-Exam symptoms दिसू लागतात! पाठदुखी, अशक्तपणा, पोटात ढवळल्यासारखे होणे, गळून गेल्यासाखे होणे, पायात गोळे येणे, ऐन पेपरच्या वेळी चक्कर येणे, केलेला अभ्यास लक्षात न राहणे यांसारख्या गोष्टींमुळे अभ्यासात लक्ष न लागणे, कित्येकदा प्रश्नपत्रिकेतील एखादा प्रश्न न वाचताच नजरेतून सुटणे यासारख्या चुकाही घडतात. अभ्यासाला लवकर उठलं की मळमळणे, उलट्या होणे, चेहरा काळवंडणे ते केस गळणे यासारख्या समस्या हमखास दिसून येतात. म्हणूनच परीक्षेपूर्वीचा व परीक्षेदरम्यानचा आहार हा अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो. झोप टाळण्यासाठी जेवण टाळणे हा निश्चितच पर्याय नाही. मात्र, पोटभरून खाण्यापेक्षा किंवा अगदीच उपाशी राहण्यापेक्षा दिवसातून चार ते पाच वेळा माफक आहार घ्यावा. दिवसाची सुरवात पौष्टिक Breakfast ने करावी. त्यामध्ये उत्तम दर्जाची प्रथिने, कर्बोदके आणि शक्य असल्यास एखादा अक्रोड, बदाम असावा. दोन्ही वेळेच्या जेवणामध्ये पोळी-भाजी; भात-वरण, एखादी कोशिंबीर यांचा समावेश असावा. चहा, कॉफी यांचा वापर मर्यादित ठेवून थंड ताक, कैरीचे पन्हे, नारळाचे पाणी, घरगुती सरबते यांसारखे पर्याय निवडावेत. यामुळे acidity, dehydration यांसारख्या समस्या आटोक्यात ठेवता येतात. संध्याकाळी न्याहारीसदेखील थंड मिल्क शेक, फ्रूट प्लेट आदी पर्याय निवडता येतील. अशा प्रकारच्या पर्यायांमुळे पचनास हलके, शरीरास तरतरी आणणारे अन्न निवडता येईल. आहाराबरोबरच वेळेचे नियोजन, अभ्यासामध्ये पुरेशी विश्रांती घेणे याही गोष्टी एकंदरीत परीक्षेतील यशासाठी, एकाग्रता वाढविण्यासाठी नक्कीच महत्त्वाच्या ठरतात. या वेळेच्या नियोजनात दिवसातील कमीत कमी 15-20 मिनिटे व्यायामासाठी दिली तर अभ्यासातील अशी विश्रांती अधिकच उल्हासदायक आणि उपयुक्त ठरू शकते. प्राणायाम, योग, सूर्यनमस्कार, चालणे यांसारखे सहजशक्य असलेले व्यायाम अवश्य करावेत. अभ्यासाबरोबरच आहार, वेळेचे नियोजन आणि पालकांचा सकारात्मक पाठिंबा असल्यास परीक्षेचे आव्हान यशस्वीरीत्या पेलणे शक्य होईल. हे जरूर करा… एकाच वेळी पोट भरून खाऊ नका. |
विद्यार्थी-मित्रांनो, आहाराची “परीक्षा’ घेऊ नका! (केतकी इतराज,Sunday,March 13, 2011)
Please follow and like us: