कुणाला वाटत नाही आपण “फिट’ असावं? शिडशिडीत असावं? पण त्यासाठी मेहनत घेण्याची तयारी खूपच कमी जणांची असते….व्यायाम, चालणे-धावणे वगैरे सोडा; आपल्या रोजच्या आहारात जरी काही पथ्ये आपण पाळली तरी “तुंदिल तनू’ बरीचशी आटोक्यात राहील…सुयोग्य आहाराद्वारे ती आटोक्यात कशी ठेवायची, ते शिका या चुरचुरीत सदरातून !!
प्रसंग साधासा…मंडईतून फेरफटका मारताना खूप जुन्या ओळखीचे काका समोर दत्त म्हणून उभे. वडिलांशी अगदी अरे-तुरेच्या गप्पा सुरू झाल्या. मग माझ्याकडे पाहून आश्चर्यानं उद्गारले ः “अरे! एवढीशी असताना खांद्यावर खेळवले होते मी हिला. केवढी मोठी झाली ! काय करते सध्या?’
“डाएटिशियन (आहारतज्ज्ञ) आहे,’ असे सांगताच, “अरे वा! घरी सगळ्यांनाच डाएटवर ठेवले नाहीस ना गं!’ असे मिस्किलोद्गार “टाकुनिया बाबा गेला!’
बाहेरचंच काय, अगदी आमच्या घरच्यांचच ढळढळीत उदाहरण घ्या ना! अधिक मासाचा कार्यक्रम. साग्रसंगीत श्रीखंड-पोळी, बटाट्याची भाजी, पहिला साधा भात, शेवटचा मसाला भात, तुपाची धार…अगदी मराठमोळा मेनू. शिवाय आग्रह करणारे एक से एक महारथी. माझ्याकडे कटाक्ष टाकूनच,”आमच्या डाएटिशियनला चालतं ना!’ असे म्हणून सर्वत्र हास्यकल्लोळ.मी आपली हसावं की रडावं या विचारात. “वळू’मधला “फारिष्ट’सारखं लोकांनी “डाएट’वरून टाकळलं. डबा ग्रुपसुद्धा,” ती हे घेणार नाही, त्याचं तिचं डाएट असतं’ अशी फिरकी घेणारा! खरं तर वास्तविक पाहता डाएट या शब्दामागं एक छानशी संज्ञा आहे. “डाएटिक्स’ म्हणजे आहारशास्त्र! असं शास्त्र की जे आयुष्यातील विविध टप्प्यांवर आहाराची पूरकता, परिपक्वता आणि रोगाच्या अवस्थेनुसार अन्नातील आवश्यक बदल सुचवतं. व्यापकार्थाने विचार करता केवळ निरोगी असणं म्हणजे आरोग्य नव्हे. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य अंगी बाणणं हेच खरं आरोग्य. शरीराचं खऱ्या अर्थानं आरोग्य व्यवस्थित असेल तर मन आणि बुद्धी आपापल्या संपूर्ण क्षमतेनुसार कार्यरत राहू शकते.
संपूर्ण वाढ, सुदृढ आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवून निरोगी राहण्यासाठी सर्वांनीच डाएट करायला हवे. तेव्हा सुरवात करू या. आहाराचे विविध कंगोरे येत्या काही भागांत आपण पाहू या. डाएट म्हणजे शरीराला आवश्यक ते, आवश्यक प्रमाणात आणि योग्य त्या वेळेला खाणं, इतकंच! चौरस; परिपूर्ण आहार, हीच निरोगी आयुष्याची खरी गुरुकिल्ली.