जाऊ नका ‘जंक फूड’च्या ‘आहारी’! (केतकी इतराज,Sunday, February 20, 2011)

सेच एकदा एक आजोबा या सदरातील माझ्या लेखावर अभिप्राय देण्यासाठी आले. वार्धक्‍यातही त्यांचा चेहरा प्रसन्न होता. शरीरयष्टी उत्तम होती. आहाराविषयीची त्यांची आस्था कळण्यासाठी या गोष्टी पुरेशा होत्या. खाऊच्या बटव्यातून वेगवेगळ्या प्रकारचा खाऊ काढावा, तसे एक से एक किस्से सांगत आमच्या गप्पा रंगत होत्या. पण सरतेशेवटी आजोबांची एकच खंत होती व ती म्हणजे ः “आमच्या वेळी नव्हतं हो असं!’

ते गेल्यावर मी त्यांच्या या वाक्‍यावर विचार करू लागले. तेव्हा ते मलाही पटलं खरं! पूर्वीची जीवनशैली, अंगमेहनतीची कामं यामुळं भूकही कडकडून लागायची. साधा; पण सकस आहार असायचा. “अन्न हे पूर्णब्रह्म’ म्हणून त्याचं सेवन केलं जायचं. आजकाल मात्र खाण्याबाबतच्या आवडी-निवडींबाबत काही सांगायलाच नको. जिभेचे कितीही चोचले पुरवले तरी लाडावलेल्या मुलांची तोंडं वेंगाडलेली ती वेंगाडलेलीच…! विचार करता करता मी मलाच प्रश्‍न विचारला ः “खरंच! काहीतरी चुकतंय आपलं, असं नाही वाटत?’

देश-विदेशातील खाद्यसंस्कृती आणि तेथील वेगवेगळे खाद्यपदार्थ आज आपल्या स्वयंपाकघरात हजर असतात. पूर्वीपेक्षाही अधिक विविधता आहारात आणणं आज सहजशक्‍य आहे. प्रगत विज्ञानामुळं प्रत्येक खाद्यपदार्थाची पौष्टिकता आज मोजून-मापून घेता येते आणि आपल्या आहारात अधिकाधिक परिपूर्णता आणता येते. मग तरीसुद्धा कुठंतरी काहीतरी चुकत आहे, ते का?

घड्याळाशी स्पर्धा करीत आजची स्त्री चाकोरीबाहेरील आव्हानं समर्थपणे पेलत आहे. जुनाट चौकटी मोडून ती यशस्वी होत आहे. ही खचितच चूक नाही…मात्र बाहेरच्या जगात असं तोडीस तोड उतरताना “टमी की सुनो या ममी की’ म्हणत आपल्या घरातल्या लहानग्यांचं विश्‍वच अशा पदार्थांनी व्यापलेलं असतं, हे तिच्या लक्षात आलं नाही का? येत नाही का?

शिक्षणासाठी बाहेरगावी राहणाऱ्या नवयुवकांमध्येही पिझ्झा-बर्गरची वाढती “क्रेझ’ही आपल्या ध्यानात आली नाही का? या गोष्टींना आपण पर्याय कसा शोधणार आहोत?

अशा ready to eat  पदार्थांमध्ये अतिरिक्त प्रमाणात तेल, तूप, बटर आदी पदार्थ, साखर, मीठ आदी preservatives आणि कित्येक additives वापरली जातात. बरेचसे मैद्याचे घटकही यातच मोडतात. अशा पदार्थांच्या वारंवार सेवनानं उच्च रक्तदाब, हृदयविकार, लहानग्यांमध्येही वजनवाढीची समस्या आदी धोके उद्‌भवण्याची शक्‍यता वाढलेली दिसते. क्वचितप्रसंगी जिभेचे चोचले पुरवण्यासाठी असे पदार्थ ठीक असतात; परंतु त्यांच्या “आहारी’ न जाणंच योग्य! आणि त्यापेक्षाही हे पदार्थ निवडतानाच काही काळजी घेता आली, जागरूकता दाखविता आली तर…?
कशी घ्यायची ही काळजी ? पाहू या पुढील लेखात…

Please follow and like us: